चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीकडे तालुक्यातील इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले होते.
तहसील कार्यालयात प्रशासनाच्या उपस्थितीत नियमानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.
आरक्षण जाहीर होताच संबंधित गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले, याबाबत गावागावांत चर्चा रंगली आहे.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंचपदाचे आरक्षण महत्त्वाचे ठरणार असून, आरक्षणानुसार गावागावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








