२ ब्रास रेतीसह टिप्पर ताब्यात; तहसील कार्यालयात वाहन जमा
चंद्रमुनी बन्सोड सडक अर्जुनी :
तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत रेतीने भरलेला एक टिप्पर ताब्यात घेतला. ही कारवाई रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता मौजा डव्वा येथे करण्यात आली.
डव्वा परिसरातून रेतीने भरलेला लहान टिप्पर जात असताना महसूल पथकाने त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान टिप्परमध्ये सुमारे २ ब्रास रेती आढळून आली. विनापरवाना रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याच्या कारणावरून महसूल प्रशासनाने संबंधित वाहनावर कारवाई केली.
कारवाई करण्यात आलेल्या टिप्परचा क्रमांक MH-35-AJ-5297 असून, हे वाहन रविंद्र सेउतकर, रा. पुरगाव, ता. गोरेगाव जि. गोंदिया यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
ही कारवाई सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महसूल पथकात ग्राम महसूल अधिकारी लिलाधर कापगते, यू. डी. रहांगडाले, हर्षकुमार उईके आणि एम. ए. कुरैशी यांचा समावेश होता.
कारवाईनंतर रेतीने भरलेला टिप्पर सडक अर्जुनी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली आहे. तालुक्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





