चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
केसलवाडा मार्गावर अपघाताची दाट शक्यता

सडक अर्जुनी तालुक्यातील अत्यंत गजबजलेल्या शेंडा मार्गावर प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण रुग्णालय ते
केसलवाडा मार्गादरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या पश्चिम बाजूला रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाकलेली सागवानाची झाडे आणि झुडपे अपघाताला थेट निमंत्रण देत असून रस्त्याचा हा भाग प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. सडक अर्जुनी ते शेंडा या मार्गावर दिवसभर आणि रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या अगदी कडेला झुकलेल्या सागवानाच्या झाडांमुळे व फांद्यांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणारे वाहन किंवा रस्ता स्पष्ट दिसत नाही. वास्तविक पाहता सिमेंट रस्त्याचे बांधकाम करतानाच संबंधित कंत्राटदाराने ही धोकादायक झाडे हटवणे गरजेचे होते. मात्र वन विभागाच्या अडेलतटु धोरणामुळे आणि झाडे कापण्याची परवानगी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ही झाडे तशीच ठेवून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करून पळ काढला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आज हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मोठा अपघात घडल्यानंतर आणि एखाद्याचा नाहक बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. बांधकाम विभाग आणि वन विभागाने तांत्रिक अडसर दूर दूर करून या मार्गावरील वाकलेली धोकादायक झाडे व त्यांच्या पसरलेल्या फांद्या तातडीने हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.





