चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
गडकुंभलीच्या डोहात आंघोळ करताना मयूर ब्राम्हणकरचा दुर्देवी अंत; पिंपळगाव-खांबी परिसरात शोककळा
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथील बारावीचा विद्यार्थी मयुर युवराज ब्राम्हणकर (वय १७) याचा साकोली तालुक्यातील गडकुंभली येथील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवार, १७ सष्टेंबर रोजी घडली. या घटनेने पिंपळगाव-खांबीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव-खांबी येथील एका नागरिकाच्या अस्थी विसर्जनासाठी मयुर ब्राम्हणकर हा कुटुंबीय व नागरिकांसोबत गडकुंभली येथील
डोहावर गेला होता. अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना मयुर आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला.
मयुर पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर मयुरचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला.
मयुरच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारावीचे शिक्षण घेत असलेल्या मयुरच्या निधनामुळे मित्र, शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद साकोली पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.





