डुग्गीपार पोलिस ठाण्यात धडक; समाजबांधवांकडून कठोर कारवाईची मागणी
चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी
आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा व अवमानकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून प्रवीण नरसिंगराव जेठेवाड यांच्याविरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर पोलिसांनी जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील आदिवासी समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तक्रारीनुसार, सोशल मीडिया माध्यमांवर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा कथित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला. संबंधित पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत समाजबांधवांनी डुग्गीपार पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या वेळी राज्याध्यक्ष कर्मचारी संघटना यशवंत मलये, जिल्हा महिला अध्यक्ष छायाताई टेकाम, कच्चारगडचे संचालक भोजराम मसराम, गोंडवाना गोंड समाजाचे तालुका अध्यक्ष संतोष धुर्वे, तालुका महिला अध्यक्ष लता कुंभरे, कोषाध्यक्ष राजेश मंडारी, हलबा/हलबी समाज अर्जुनीचे तालुका सचिव संजय प्रधान, पीपल्स फेडरेशनचे संचिव संदीप धानगून, अस्विन प्रत्येके यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
सोशल मीडियावर कोणताही मजकूर प्रसारित करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करण्याची गरज या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेला कथित मजकूर, त्याचा संदर्भ तसेच संबंधित परिस्थितीची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, तपासरांती प्रकरणातील पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होणार आहेत.






